- संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप..
- तातडीच्या कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ फेब्रुवारी २०२६) :- पिंपळे सौदागर प्रभाग २८ मध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रभागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
काटे यांनी यापूर्वीही संबंधित विभागाकडे लेखी व दूरध्वनीद्वारे वारंवार मागणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र पशुवैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेषतः पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भटक्या कुत्र्यांमुळे प्रभागातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून तक्रारी वाढत असून काही ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्याची माहितीही पत्रात देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण, लसीकरण आणि नियंत्रणासाठी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अन्यथा प्रभागातील नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे.











