- मंगळवारी सकाळी अनियमित व कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सेक्टर क्रमांक २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २३) निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत कोणताही बिघाड होऊ नये, यासाठी वेळोवेळी यंत्रणांची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्यानुसार ही कामे नियोजित करण्यात आली आहेत. त्यामुळे सोमवारी शहरातील सर्व भागांचा संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
तसेच या कामांचा परिणाम म्हणून मंगळवारी (दि. २४) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद कालावधीत नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












