- मोकाट कुत्री, पाणीटंचाई, खड्डे, वाहतूक कोंडीसारखे विषय क्षणात बेदखल?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब विशेष सभा शुक्रवारी (दि. २०) पार पडली. या सभेच्या विषयपत्रिकेवर स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड हा प्रमुख विषय होता. त्यानंतर सभा गुंडाळण्याऐवजी तब्बल पाच तास विषय पत्रिकेवर नसलेल्या मुद्द्यांवर नगरसेवकांनी पोटतिकडीने चर्चा केली. मात्र, आता पुढे येतय की, त्या चर्चा, मागण्या, समस्या या सभेसाठी अनधिकृत विषयच होता. दरम्यान चर्चा करण्यात आलेले विषय महापालिकेच्या विषय पत्रिकेवरील न्हवते. मग सभेत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी शहरातील विविध प्रश्नांवर केलीली चर्चा हा फक्त टाईमपास ठरला का? असा सवाल उपस्थित होतोय.
मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, पीएमपीएमएल बससेवा, ड्रेनेज लाईनची स्थिती, मेट्रो कामांमुळे झालेली रस्त्यांची दुरवस्था, मालमत्ता कर अभय योजना, स्मार्ट सिटी कामांची गुणवत्ता अशा विविध मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाकडे तक्रारी मांडल्या. काही स्मारकांबाबत आणि तैलचित्र उभारणीसंदर्भातही सूचना करण्यात आल्या.
दरम्यान, राजकीय जाणकारांच्या मते कोणताही विषय अधिकृतरीत्या मंजूर होण्यासाठी तो विषयपत्रिकेवर असणे आवश्यक असते. त्यामुळे सभेत जाहीर झालेल्या मुद्द्यांबाबत पुढील प्रक्रिया काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“त्या दिवशीच्या विषयपत्रिकेवर स्थायी समिती व इतर विषय समिती सदस्यांची निवड हा एकमेव विषय होता. त्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण झाली. इतर मुद्यांवर जी चर्चा झाली, ती सभागृहाची भावना म्हणून नोंदवली जाईल; मात्र त्यांना अधिकृत ठरावाचा दर्जा नाही.”
– मुकेश कोळप, नगरसचिव, पिं.चिं.मनपा…











