- प्रियदर्शनी स्पोर्ट्स फौंडेशनचा रहाटणीतील अमृतवेल एल्डर केअर सेंटरमध्ये उपक्रम…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी २०२६):- शिवजयंतीचे औचित्य साधत चिंचवड येथील प्रियदर्शनी स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने रहाटणीतील अमृतवेल एल्डर केअर सेंटरमध्ये ज्येष्ठ व निराधार नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठांना मानसिक आनंद मिळावा तसेच बुद्धिबळाच्या माध्यमातून त्यांचे मानसिक संतुलन आणि एकाग्रता वाढावी, या उद्देशाने बुद्धिबळ संचांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी फौंडेशनच्या अध्यक्षा वंदना मंगल यांनी ज्येष्ठ नागरिकांना बुद्धिबळ खेळाचे मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष ज्येष्ठांसोबत बुद्धिबळ खेळत संवाद साधला आणि त्यांचे समुपदेशनही केले. या उपक्रमामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास रविंद्र काळे (टाटा मोटर्स), निमिता मंगल (आकाश इन्स्टिट्यूट) तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या अलका भावसार उपस्थित होत्या. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
प्रियदर्शनी स्पोर्ट्स फौंडेशनतर्फे भविष्यातही समाजातील विविध घटकांसाठी क्रीडा व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.












