- प्राधिकरण सेक्टर २३ येथे आ. शंकर जगताप यांनी घेतली पाणीपुरवठा विषयक आढावा बैठक…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण सेक्टर २३ येथे पाणीपुरवठा विभागासमवेत सविस्तर आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रभाग क्र. २७ मधील रहाटणी–तापकीर नगरमधील पाणीप्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
नगरसेवक बाबा त्रिभुवन याबाबत माहिती देताना म्हणाले, मार्च ते मे या उन्हाळी कालावधीत वाढणाऱ्या तक्रारी लक्षात घेता पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम व नियोजनबद्ध करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रभागातील बैठी घरे तसेच सर्व सोसायट्यांसाठी स्वतंत्र व दीर्घकालीन पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला.
तसेच सांडपाण्याचा पुनर्वापर सक्तीने राबविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावी करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील गरजांसाठी आतापासूनच ठोस नियोजन करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. रहाटणीकरांना नियमित, सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने समन्वयाने व जबाबदारीने कार्य करावे, असे स्पष्ट करण्यात आले.











