संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- पिंपरीत मोरवाडी चौक येथील ‘ग्रेड सेपरेटर’ मध्ये मंगळवारी (दि. २४) सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याने कर्मचारी, विद्यार्थी व व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्धारित उंचीपेक्षा जास्त उंचीचा कंटेनर ग्रेड सेपरेटरखालून जात असताना अडकला. त्यामुळे मोरवाडी चौकातून नाशिक फाटा तसेच चिंचवड स्टेशनकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबली. काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अडकलेला कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या मते वाहतूक सुरळीत होण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागला.
या घटनेमुळे ग्रेड सेपरेटरखालील उंची मर्यादा आणि जड वाहनांच्या प्रवेशाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संबंधित विभागाने उंचीबाबत स्पष्ट सूचना फलक लावावेत तसेच सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी अवजड वाहनांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.











