- महापौरांच्या त्या निर्णयामुळे महिला सफाई कर्मचारी होणार बेरोजगार?…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या रात्रीच्या स्वच्छता उपक्रमासह आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा महापौर रवि लांडगे यांनी नुकताच घेतला. या बैठकीत त्यांनी रात्रीच्या स्वच्छता मोहिमेत महिलांची शिफ्ट बंद करण्यात यावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित अधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे फायदे जाणून घेतल्यानंतर रात्रीची स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी; मात्र त्यात केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग ठेवावा, अशी भूमिका महापौरांनी मांडली. मात्र, या निर्णयानंतर ‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेच्या नावाखाली त्यांच्याच रोजगारावर गंडांतर येते की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेकडून स्वच्छतेच्या कामासाठी ज्या ठेकेदारांना मनुष्यबळ पुरविण्याचे ठेके देण्यात आले आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुरुष कर्मचाऱ्यांना तुलनेने अधिक वेतन द्यावे लागते, त्यामुळे खर्च नियंत्रणासाठी ठेकेदार महिलांना प्राधान्य देत असल्याची चर्चा आहे.
अशा परिस्थितीत रात्रपाळीत केवळ पुरुष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची असेल तर विद्यमान महिला सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागणार आहे. परिणामी ठेकेदार हे महिला कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून पुरुष कर्मचाऱ्यांची भरती करण्याची शक्यता नाकारता येत नाही.












