सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २५ फेब्रुवारी २०२६) :- ऑनलाईन शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक किंवा जलद नफ्याच्या आमिषाला बळी पडताना नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींच्या व्हॉट्सअॅप ग्रुप, अॅप किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत, नोंदणीकृत संस्थांची खातरजमा करावी. जास्त परताव्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांपासून दूर राहणे हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे पोलिस वारंवार सांगत असतानाही कमी कालावधीत जास्तीत पैसे मिळविण्याच्या नादात अनेकजण आपला खिसा रिकामा करण्याच्या मागे लागल्याचे दररोज घडणाऱ्या ऑनलाईन घोट्याळ्यातून निदर्शनास येत आहे. वाल्हेकरवाडीत देखील अशीच एक घटना घडली आहे.
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात टक्केवारीने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नोकरदाराची तब्बल ४२ लाख ४८ हजार ९०० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी फिर्यादी सगरे (वय ५१, रा. वाल्हेकरवाडी) यांनी तक्रार दिली आहे.
प्रकार घडला असा…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी व्हॉट्सअॅपद्वारे फिर्यादीशी संपर्क साधून ‘v3yes security’ या ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करून घेतले. शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत ‘YES SECURITY’ नावाचे अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. यानंतर विविध शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा भरून घेतल्या. अॅपवर खोटा नफा दाखवून विश्वास संपादन केला. मात्र तो नफा काढण्यासाठी कर व इतर शुल्कांच्या नावाखाली पुन्हा पैसे भरण्यास भाग पाडले. अशा प्रकारे एकूण ४२,४८,९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. संबंधित बँक खात्यांचा तपास सुरू असून आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जाधव करीत आहेत.












