सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ फेब्रुवारी २०२६) :- पुनावळे येथील उच्चभू गृहनिर्माण सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. इमारतीच्या २४ व्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, हा प्रकार आत्महत्येचा असावा असा पोलिसांचा संशय आहे.
वैभव दत्तात्रय सुतार (वय २५, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास पुनावळे भागातील पेठकर सियोना हाउसिंग सोसायटीमध्ये एकाने उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता वैभव गंभीर जखमी अवस्थेत आढळला.
तपासात उघड झाले की, मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी वैभवने कुटुंबीयांना कामानिमित्त चेन्नईला जात असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात तो पिंपरी-चिंचवड शहरातच वास्तव्यास होता. बुधवारी रात्री वैभव, सौरभ तापकीर व इतर मित्र जेवणासाठी एकत्र आले होते. त्यानंतर ही घटना घडली.
वैभव गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तो चांदखेड परिसरातील मित्र सौरभच्या पोल्ट्री फार्मवर काम करत होता. पोलिसांना शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.












