न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ मार्च २०२६) :- नवी सांगवी येथील फेमस चौक ते साई चौक दरम्यान असलेल्या आदर्श नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मोकळी जागा असल्याचा गैरफायदा घेत काही बेजबाबदार नागरिक येथे सर्रास कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता वाढून दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर अर्बन सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (कै. अजितदादा पवार) चे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा दूधनाळे यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे.
सकाळी सहा वाजता संबंधित ठिकाणी आरोग्य कर्मचारी नेमल्यास कचरा टाकणाऱ्यांना धाक बसेल, असा प्रयोग इतर ठिकाणी यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.












