- प्रिस्टीन प्रोलाईफ फेज-३ सोसायटीचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०४ मार्च २०२६) :- वाकडमधील प्रिस्टीन प्रोलाईफ फेज-३ सोसायटीने सौरऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीत वेगळे उदाहरण घालून दिले आहे. महावितरणच्या सर्व प्रक्रिया आणि परवानग्या पूर्ण करून अवघ्या चार महिन्यांत १२० किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प सोसायटीत कार्यान्वित करण्यात आला आहे.
१ मार्च २०२६ रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ७६ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी शासनाकडून २१ लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. उर्वरित निधी सोसायटीतील सभासदांनी प्रत्येकी सुमारे ७ हजार रुपये वर्गणी देऊन उभारला. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोसायटीच्या वीज खर्चात मोठी बचत होणार आहे. दर महिन्याला सुमारे २ लाख ३० हजार रुपयांपर्यंत वीज बिलात बचत होणार असल्याने सोसायटीवरील आर्थिक भार कमी होणार असून दीर्घकालीन दृष्टीने हा उपक्रम किफायतशीर ठरणार आहे.
सोसायटीचे सचिव स्वरूप पाटील यांनी सांगितले की, सौरऊर्जेमुळे पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे. सुरुवातीला सर्व सभासदांना या प्रकल्पाचे फायदे समजावून सांगितले. त्यानंतर सर्वांनी सहकार्य करत वर्गणी जमा केल्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने शक्य झाली.
सोसायटीचे अध्यक्ष अल्केश चरपे यांनी सांगितले की, सोसायटी समितीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि रहिवाशांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास गेला. हरित ऊर्जा वापराला प्रोत्साहन देत शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे परिसरातील इतर गृहनिर्माण सोसायट्यांसाठीही सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.












