- पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..
- काळेवाडी, निगडी व चिखली येथे गावठी व विदेशी दारूचा साठा जप्त..
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०४ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात दारुबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असून सलग तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदेशीर दारू विक्री व वाहतुकीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. या घटनांमुळे शहरातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काळेवाडी पोलिस ठाण्यांतर्गत पहिल्या घटनेत ३ मार्च रोजी सकाळी संदिपनगर, थेरगाव येथे एका महिलेने घराच्या आडोशाला २५ हजार रुपये किमतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीररीत्या साठवून विक्री करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित महिलेला नोटीस देण्यात आली आहे.
दरम्यान, निगडी पोलिस ठाण्यांतर्गत दुसऱ्या घटनेत थरमॅक्स चौक ते साने चौक रस्त्यावर विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करताना आरोपी योगेश गोवर्धन वारे (वय ३१) याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून २७ विदेशी दारूच्या बाटल्या व मोपेडसह एकूण सुमारे ५९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात बार मालक प्रशिल शेट्टी यालाही नोटीस देण्यात आली आहे.
तसेच चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कृष्णानगर बसस्टॉपजवळ २ मार्च रोजी दुपारी टेम्पोमधून बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना मंगेश दयाराम नेरकर (वय ४५) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातील टेम्पोमध्ये सुमारे ४७ हजार ९२५ रुपयांचा दारूचा साठा आढळून आला. ही दारू निगडी येथील वाईन शॉपमधून आणल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील तीन वेगवेगळ्या भागांत अल्पावधीतच बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक प्रकरणे उघडकीस आल्याने पोलिसांच्या गस्त व नियंत्रण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.












