- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पीएमआरडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.४ मार्च २०२६) :- राज्य शासनाने बुधवारी (४ मार्च) आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त योगेश म्हसे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना आता मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आले आहे.
२००९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले योगेश म्हसे हे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात पुणे महानगर प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम करण्यात आले होते. आता त्यांची बदली मुंबई येथील मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.
दरम्यान, २०११ बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. चौधरी हे यापूर्वी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते.
राज्य शासनाच्या या आदेशानुसार डॉ. अभिजित चौधरी लवकरच पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. पुणे महानगर प्रदेशातील विकास प्रकल्प आणि नियोजनाच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.












