न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ७ मार्च २०२६) :- हिंजवडी येथील आय. स्क्वेअर आयटी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी वैचारिक शिवजयंती उत्साहात साजरी केली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील प्रेरणादायी विचार मांडणारी भाषणे केली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे दर्शन घडवणारा प्रभावी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाचा सर्वात प्रभावी भाग म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतलेली शपथ ठरली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व सद्गुण आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला. तसेच वाईट सवयी व व्यसनांचा त्याग करण्याची आणि महाराजांच्या आदर्शांप्रमाणे स्त्रियांच्या सन्मानाचे जतन करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, प्राध्यापकवर्ग तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक संस्कार घडविण्यास हातभार लागत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.












