- नवनिर्वाचित महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे आश्वासन…
मा. अशोक लोखंडे : – संपादक
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ मार्च २०२६) : पुणे शहर आणि लगतचा परिसर राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून सुनियोजित नागरीकरणासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नवनिर्वाचित महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. त्यांनी नुकताच पीएमआरडीएचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भविष्यातील विकास आराखड्याबाबत माहिती दिली.
पुणे शहराचे भविष्य हे पीएमआरडीएशी जोडलेले असल्याचे त्यांनी नमूद करत शहरी आणि ग्रामीण भागातील विकासकामांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. पुणे जिल्हा हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असून येथील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.
मोठे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठीही ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुण्यात मेट्रो प्रकल्प सुरू असून अलीकडेच एका उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मोठे रस्ते, एसटीपी प्लॅन्ट आणि पर्यावरण संवर्धनासाठीचे प्रकल्प यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
पीएमआरडीए अंतर्गत विकास आराखडा (डीपी) तयार करण्याबरोबरच आधुनिक अर्बन प्लॅनिंगवर भर दिला जाणार आहे. बांधकाम परवानगी प्रक्रियेमधील अडथळे दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. चांगल्या कामांना लोकांचे सहकार्य मिळते, मात्र काही वेळा विकासासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सुमारे ४३ हजार कोटी रुपयांची कामे प्रत्यक्षात आणण्यावर भर दिला जाईल. ग्रामीण भागाशी पीएमआरडीएचा संपर्क कमी असल्याची बाब मान्य करत ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी परवडणारी घरे, दळणवळण सुविधा आणि विकासाला चालना देणारे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
संस्था स्थिर होण्यासाठी काही वेळ लागतो, मात्र प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी पुढील आठवडाभरात विविध विभागप्रमुखांच्या आढावा बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्याकडे विशेष लक्ष असून पुणे आणि परिसराच्या विकासासाठी नियोजनबद्ध अर्बन डेव्हलपमेंटचा आराखडा तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.











