- सीसीटीव्ही देखरेख, वाहतूक नियंत्रण व नागरी सेवांच्या मॉनिटरिंगची घेतली माहिती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला (ICCC) महापौर रवि लांडगे यांनी भेट देत शहरातील विविध नागरी सेवांचे तांत्रिक पद्धतीने होणारे मॉनिटरिंग आणि नियंत्रण प्रणालीची सविस्तर माहिती घेतली.
स्मार्ट सिटी संकल्पनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या केंद्रातून शहरातील वाहतूक व्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षाव्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद यांचे रिअल-टाईम निरीक्षण केले जाते. या प्रणालीमुळे विविध विभागांमध्ये समन्वय साधून त्वरित कार्यवाही करणे सुलभ झाले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अभिमान भोसले यांनी दिली.
महापालिकेच्या माध्यमातून शहरात एकूण ८ हजार ७९० सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण प्रणालीशी जोडण्यात आले असून त्यापैकी ३ हजार ८२७ कॅमेरे सध्या कार्यरत आहेत. प्रमुख चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांवर या कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवली जाते.
दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे बंद असलेले कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना महापौर लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुकर व कार्यक्षम नागरी सेवा देण्यासाठी या कमांड सेंटरची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.












