- ड्रेनेज स्वच्छतेसाठी यंत्रसामग्री वाढविण्याचे निर्देश…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयातील विविध कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत महापौर रवि लांडगे यांनी नाराजी व्यक्त करत प्रलंबित कामे तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. उघड्या गटारे व नाल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर तातडीने जाळ्या बसवाव्यात, तसेच शहरातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची संख्या वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करणे, प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि अतिक्रमणाविरोधात प्रभावी कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण हटविताना फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.
नगरसदस्य व नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा वेळेत निपटारा होत नसल्याबाबतही बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले. तक्रारींचा निपटारा करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
दरम्यान, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी अतिक्रमण कारवाई, प्रलंबित तक्रारी व महसुलाचा तपशील संगणकीय सादरीकरणाद्वारे मांडला. शहरातील विविध समस्यांवर पुढील तीन महिन्यांनी पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे महापौर लांडगे यांनी स्पष्ट केले.












