- आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश; सव्वा कोटींची मालमत्ता जप्त…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि.१० मार्च २०२६) :- हिंजवडी आयटी पार्कमधील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि.’ कंपनीकडून शेकडो तरुण अभियंत्यांची झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधले होते.
ऑगस्ट २०२५ मध्ये कंपनीने फ्रेशर्स अभियंत्यांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवत ट्रेनिंग व नोकरीच्या नावाखाली प्रत्येक उमेदवाराकडून १ ते २.५० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. काही महिने ऑनलाइन काम करून घेतल्यानंतर उमेदवारांना नोकरी नाकारत आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले.
या प्रकरणात आतापर्यंत ३५७ विद्यार्थ्यांची सुमारे ६ कोटी ४९ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपींविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या १ कोटी २७ लाख रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
एसआयटीमार्फत पुढील तपास करून पीडित विद्यार्थ्यांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












