- प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा; राज्यभरातून समाजबांधव सहभागी होणार – विजय शिंदे…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- अखिल गुरव समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली सकल गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी, १७ मार्च २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर विराट धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ‘चलो मुंबई’ या घोषणेखाली होणाऱ्या या आंदोलनाला राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे यांनी दिली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ मार्च रोजी जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात राज्यव्यापी पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जेजुरी नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.
देवस्थान इनाम वर्ग ३ जमिनींचा प्रश्न मार्गी लावणे, मंदिर ट्रस्टमध्ये गुरव समाजाला ५० टक्के विश्वस्त पदे देणे, पुजाऱ्यांचा वंशपरंपरागत पूजेचा हक्क कायम ठेवणे तसेच ६० वर्षांवरील पुजाऱ्यांना निवृत्ती वेतन व मानधन देण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शितल शिंदे यांनी केले आहे.


















