न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि.१० मार्च २०२६) :- जागतिक महिला दिनानिमित्त उन्नति सोशल फाऊंडेशनतर्फे “स्वरनिनाद” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मराठी-हिंदी भक्तीगीत, भावगीत व चित्रपटगीतांची बहारदार मैफल रंगली तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २१ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
उन्नति सोशल फाऊंडेशनच्या पिंपळे सौदागर येथील कार्यालयात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला सामाजिक, सांस्कृतिक आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात गायिका भारती न्यायाधीश यांनी सादर केलेल्या भक्तीगीत, भावगीत आणि चित्रपटगीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. निवेदिका वसुधा गोडसे यांनी कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन करत वातावरण अधिक रंगतदार केले. संगीताच्या सुरेल सादरीकरणासोबतच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या की, ” समाजात महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांचे कार्य समाजासमोर आणणे आणि महिलांना प्रेरणा देणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महिला सशक्तीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असून उन्नति सोशल फाऊंडेशन यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.”
समाजसेविका शारदाताई मुंडे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, ” महिला सन्मानाचे कार्यक्रम हे केवळ औपचारिकता नसून समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी पाऊल असते. समाजात अनेक महिला शांतपणे आणि निस्वार्थपणे विविध क्षेत्रात काम करत असतात. अशा महिलांच्या कार्याचा गौरव समाजासमोर झाला तर त्यांना प्रोत्साहन मिळते आणि इतर महिलांनाही समाजकार्यात पुढे येण्याची प्रेरणा मिळते. महिलांना संधी, सन्मान आणि प्रोत्साहन मिळाले तर त्या समाज परिवर्तनात मोठे योगदान देऊ शकतात. उन्नति सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेला हा उपक्रम महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणारा आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन उन्नति सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. संजय तात्याबा भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
याप्रसंगी समाजसेविका शारदाताई मुंडे , सौ. सपनाताई शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिताताई संदीप काटे, डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे, पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय भिसे, उन्नती सखीच्या उपाध्यक्षा रश्मी मोरे तसेच आनंद हास्य क्लबचे सभासद, ऑल सीनियर सिटीझन असोसिएशनचे सभासद, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघाचे सभासद, विठाई वाचनालयाचे सभासद आणि नवचैतन्य हास्य क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.












