- पोलिसांनी थरारक पाठलाग करत केली सुटका…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि काळेवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून दोन देशी पिस्टल, सहा जिवंत काडतुसे आणि इतर साहित्यांसह एकूण १८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
९ मार्च रोजी सायंकाळी रहाटणी येथील शिवराजनगर परिसरात एका व्यापाऱ्याचे पाच जणांनी स्विफ्ट कारमधून अपहरण केले. आरोपींनी फिर्यादीकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागून रक्कम न दिल्यास व्यापाऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी अपहृत व्यक्तीला उत्तरप्रदेशकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे संगमनेर टोलनाक्यावर सापळा रचून आरोपींना पकडले. चंद्रशेखर गौड, दिलीप सरोज, रिंकु सरोज, अनिल सरोज आणि मुकेशकुमार चमार अशी आरोपींची नावे आहेत.
या कारवाईदरम्यान अपहृत व्यापाऱ्याला चंदनापुरी घाट परिसरातून शोधून सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.












