- ७६ नागरिकांनी मांडल्या समस्या व सूचना; दर सोमवारी उपक्रम सुरू राहणार….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नागरिकांशी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सकारात्मक संवाद साधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस आयुक्तांची भेट’ या विशेष उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट भेटून आपल्या तक्रारी, सूचना आणि अपेक्षा मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नसून ठरावीक वेळेत ते थेट आयुक्तांना भेटू शकतात.
९ मार्च रोजी पोलीस आयुक्त कार्यालयातील शिवनेरी हॉल येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ७६ नागरिकांनी उपस्थित राहून वाहतूक, कायदा-सुव्यवस्था तसेच इतर समस्यांबाबत आपली मते व सूचना मांडल्या.
दरम्यान, दिघी पोलीस ठाण्यातील घरफोडी प्रकरणातील फिर्यादी परमेश्वर गिराम यांनी चोरीस गेलेले सोन्याचे दागिने पूर्णपणे परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस आयुक्तांचा सत्कार करून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच शहरातील ऑर्थोपेडिक डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या समस्या मांडून पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
हा उपक्रम दर सोमवारी नियमितपणे राबविण्यात येणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.












