- प्रतिभा कॉलेजमध्ये विद्यार्थी-शिक्षकांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने चिंचवड येथील प्रतिभा कॉलेजमध्ये ‘नशामुक्त समाजासाठी महिलांची भूमिका’ या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात अंमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांनी व्यसनाचे आरोग्य, कुटुंब व समाजावर होणारे दुष्परिणाम सांगून विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्या राजश्री गागरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नेहा कोडे आणि समुपदेशक विल्यम साळवी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सुमारे १५० ते २०० विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. अंमली पदार्थांबाबत माहिती मिळाल्यास ८६००००२३२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.











