- रुग्णांशी संवाद साधत सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.११ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाला भेट देत विविध विभागांची पाहणी करून आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी रुग्णालयातील सुविधा व कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.
भेटीदरम्यान उपमहापौर बाबर यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची प्रकृती, सुरू असलेले उपचार तसेच रुग्णालयात मिळणाऱ्या सेवांबाबत माहिती घेतली. ओपीडी, आपत्कालीन विभाग तसेच इतर महत्त्वाच्या वैद्यकीय सेवांची पाहणी करून रुग्णांना अधिक दर्जेदार व तत्पर सेवा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
रुग्णालयातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत सुविधा विस्तार, उपलब्ध सेवांमध्ये सुधारणा आणि रुग्णालयासमोरील अडचणींवर उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली.
वायसीएम रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असल्याने त्यांना दर्जेदार व जलद आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सांगितले.












