- हरित जीवनशैली अंतर्गत पाणी, ऊर्जा बचत व प्लास्टिक कमी करण्यावर भर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.११ मार्च २०२६) :- पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना ई-प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसुंधरेचे संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि हरित जीवनशैलीचा स्वीकार यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानाद्वारे नागरिकांनी पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात, पाणी व ऊर्जेची बचत करावी, प्लास्टिकचा वापर कमी करावा तसेच स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश देण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, हरित आणि वसुंधरापूरक ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
हा उपक्रम महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. नागरिकांनी https://majhivasundhara.in/en/lets-pledge या संकेतस्थळावर जाऊन ई-प्रतिज्ञेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.












