- पाणीपुरवठा, पाईपलाईन, दिवे दुरुस्ती व इव्ही चार्जिंग स्टेशनसह अनेक कामांना मंजुरी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.११ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. बैठकीत शहरातील विविध विकासकामांसह पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांशी संबंधित अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन टाकणे व दुरुस्ती करणे, पाणी व नदीच्या पाण्याची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, विविध प्रभागांमध्ये रस्ते दिव्यांची देखभाल व दुरुस्ती करणे, मोशी येथे दफनभूमी विकसित करणे तसेच यमुनानगर रुग्णालय आणि निगडी अमरधाम येथे जनित्र संच बसविणे या कामांना मान्यता देण्यात आली.
तसेच भक्ती शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे, मनपा शाळा व कार्यालयांतील पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करणे, गंजलेले विद्युत पोल बदलणे तसेच विविध स्मशानभूमींच्या देखभालीस मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.
बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे व स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.












