- मर्जीतील ठेकेदारावर 50 कोटींची उधळपट्टी..
- 45 कोटींचा पुतळ्याचा खर्च 65 कोटींवरुन आता 100 कोटींवर..
- अस्मितेच्या नावाखाली मलिदा लाटण्याचा प्रयत्न?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. मार्च 2026) :- संबंध जगाला हेवा वाटावा असा मोशी येथे सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा साकारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवातीला ४५ कोटी रुपये खर्च निश्चित केला होता. बोऱ्हाडेवाडी येथील पुतळ्याची बदललेली जागा, पीएमआरडीएच्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्वेन्शन सेंटर (PIECC)कडील जागेचा अपुरा ताबा आणि या कामात होणारा राजकीय हस्तक्षेप यामुळे पुतळ्याचा खर्च ४५ कोटींवरून 65 कोटींवर आणि आता तब्बल ११६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे अस्मितेच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीची अक्षरशः लूट केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याप्रती असलेले शौर्य, राज्यकारभारातील दूरदृष्टी आणि चातुर्याची उंची जगातील कोणत्याही सम्राटाला खुजी ठरवणारी आहे. महाराजांच्या या थोर कर्तृत्वाची माहिती जगापर्यंत पोहोचावी या उद्देशाने महापालिकेने २०२० मध्ये बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा १०० फुटी भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. सुमारे ४५ कोटी रुपयांच्या खर्चात पुतळा उभारून परिसराचे सुशोभीकरण करण्याचे ठरवण्यात आले आणि १६ मार्च २०२० रोजी मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले.
बोऱ्हाडेवाडी येथील पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम अर्ध्यावर आले असताना अचानक पुतळ्याची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासाठीची जागा पीएमआरडीएच्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) परिसरात निश्चित करण्यात आली. या प्रक्रियेत बराच कालावधी गेल्यानंतर ४ मार्च २०२४ रोजी त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रत्यक्ष कामाचे आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे, काम नव्याने सुरू करताना ठेकेदार मात्र तोच ठेवण्यात आला. हे काम पूर्ण करण्यासाठी १२ मार्च २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतवाढीवर मुदतवाढ देऊनही पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात ठेकेदार अपयशी ठरला आहे. त्यामुळे भावना दुखावल्या गेल्याच्या प्रतिक्रिया मावळ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
अस्मितेच्या नावाखाली मलिदा लाटण्याचा प्रयत्न?…
बोऱ्हाडेवाडी येथील पूर्वीच्या जागेत आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. जागा बदलल्यामुळे नव्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी आतापर्यंत सुमारे ६५ कोटी ८१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मूळात ४५ कोटी रुपयांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च आधीच वाढून सुमारे ६६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता पुन्हा त्याच ठेकेदाराला संधी देत पुतळा परिसरातील स्थापत्य व सुशोभीकरणाच्या कामांसाठी तब्बल ५० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतल्याची चर्चा आहे.
या अंतर्गत मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शनची ३२ कोटी ३४ लाख रुपयांची निविदा ० टक्के दराने मंजूर करण्याची प्रक्रिया महापालिकेत सुरू आहे. तसेच मुव्हिंग पिक्सेल्स कंपनीची १८ कोटी ६६ लाख रुपयांची निविदा ७ टक्के कमी दराने मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही निविदांना मंजुरी मिळाल्यास पुतळा प्रकल्पाचा एकूण खर्च ४५ कोटींवरून प्रथम ६६ कोटींवर आणि नंतर थेट ११६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे “संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदू समाजाची अस्मिता असल्याचे सांगता, आणि त्यांच्याच नावाखाली कोट्यवधींचा अनावश्यक खर्च करता का ?” असा सवाल करदाते नागरिक उपस्थित करत आहेत.















