- सभागृहात पाणीप्रश्नावरून प्रशासकीय राजवटीचे वाभाडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पवना बंद जलवाहिनी प्रकल्प आणि शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अर्थसंकल्पात नेमकी किती तरतूद करण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित होताच पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही. त्यामुळे सभागृहात प्रशासकीय राजवटीच्या कारभारावर जोरदार टीका झाली.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत सदस्यांनी मांडले. मात्र अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी नेमकी किती तरतूद आहे, याबाबत विचारणा होताच पाणीपुरवठा विभागाकडून ठोस माहिती देण्यात आली नाही. यामुळे सदस्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली.
सभागृहातील चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी प्रशासकीय राजवटीत शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाकडे स्पष्ट नियोजन नसल्याचेही सदस्यांनी नमूद केले.
दरम्यान, पवना बंद जलवाहिनी प्रकल्पासाठी सुमारे १ हजार २५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. मात्र महापालिकेकडे एवढा निधी उपलब्ध नसल्याने प्रकल्पासाठी निधी उभारणीचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप हा निधी स्वतःच्या प्रयत्नातून उभा करणार की महापालिकेच्या ठेवींवर डल्ला मारणार, असा सवालही सभागृहात उपस्थित करण्यात आला.
शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या या प्रकल्पाबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तापण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला पाणीप्रश्न केवळ चर्चेतच राहणार की प्रत्यक्षात उपाययोजना होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











