- गॅस टंचाईच्या चर्चेनंतर अन्नपुरवठा विभागासोबत आढावा बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत टंचाईच्या अफवांमुळे काही गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. याबाबत प्रशासनाकडून माहिती घेत आमदार जगताप यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठवणूक टाळावी, असे आवाहन केले.
अन्नपुरवठा परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गॅस पुरवठा नियमित सुरू आहे. काळाबाजार रोखण्यासाठी विशेष गस्त पथके तैनात करण्यात आली असून अचानक तपासण्या सुरू आहेत. घरगुती सिलिंडरचे वितरणही सुरळीत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.














