- खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केले महाराष्ट्रातील रेल्वे प्रश्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरचा प्रस्तावित मार्ग संत तुकाराम महाराजांचे पवित्र स्थळ असलेल्या भंडारा डोंगराखालून जात असल्याने या मार्गाची अलाईनमेंट बदलण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. धार्मिक भावना व पर्यावरणाचे संरक्षण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मार्गात बदल करावा, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
रेल्वेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ तसेच महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रश्नांवर लक्ष वेधले. देशात सुमारे चार हजार किलोमीटर हायस्पीड कॉरिडोर उभारण्याची योजना असून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बंगळुरू ही प्रमुख आर्थिक शहरे या मार्गाने जोडली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय पुणे–लोणावळा मार्गावर दुपारच्या वेळेत लोकल रेल्वे सुरू करावी, तसेच तिसरा व चौथा रेल्वेमार्ग उभारणीसाठी केंद्र सरकारने गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, लोणावळा आणि पनवेल स्थानकांच्या पुनर्विकासासह कर्जत स्थानकाचाही समावेश करण्याची मागणी त्यांनी केली.








