- पिंपरी-चिंचवड महापालिकेची १४ वर्षांच्या मुलींसाठी मोफत लसीकरण मोहीम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक असून योग्य वेळी घेतलेली एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लस हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो, असे मत शहरातील बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत १४ वर्षे पूर्ण पण १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना मोफत लस दिली जात आहे. मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. लाभार्थ्यांची नोंद यू-विन पोर्टलवर करण्यात येत आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी पालकांनी गैरसमज दूर ठेवून पात्र मुलींना लसीकरणासाठी आणावे, असे आवाहन केले आहे.














