- शेलारवस्ती परिसरात १२ हजार चौ.फुट जागेवरील बांधकाम पाडले…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १७ मार्च २०२६) :- चिखलीतील अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शेलारवस्ती परिसरात मोठी कारवाई केली. देहू-आळंदी मार्गालगत उभारण्यात आलेल्या औद्योगिक पत्राशेडवर सोमवारी दुपारी धडक देत संपूर्ण संरचना हटवली. सुमारे १२ हजार चौरस फूट बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आला.
अतिक्रमण विभागाच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ही मोहीम राबवली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा पथकाची मोठ्या प्रमाणात तैनाती करण्यात आली होती. नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम शांततेत पूर्ण झाली.
प्रशासनाच्या सूचनेनुसार क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अनधिकृत बांधकाम पूर्णपणे हटवले, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, चिखली, तळवडे, ज्योतिबानगर आणि कुदळवाडी भागात अशा प्रकारच्या बांधकामांची संख्या वाढत असल्याची बाब समोर येत आहे. वारंवार कारवाई होऊनही अनधिकृत शेड आणि गाळे उभे राहत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी सुरुवातीलाच नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.














