- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांचे निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१६ मार्च २०२६) :- मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या १४० फूट उंच पुतळा प्रकल्पात शासनाच्या विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय वारसांच्या १०० फूटांपेक्षा अधिक उंचीच्या पुतळ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या २ मे २०१७ च्या शासन निर्णयासह जिल्हा पुतळा समिती, महानगरपालिका अधिनियम आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. मात्र या प्रकल्पात अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांचे पालन झाले नसल्याचे दिसून येत आहे.
पुतळ्याच्या क्ले मॉडेलला राज्य कला संचालनालयाची तांत्रिक मंजुरी, जिल्हा पुतळा समितीची परवानगी, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल, मटेरियल टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी इन्स्पेक्शन तसेच विंड टनेल टेस्ट यांसारख्या आवश्यक तांत्रिक प्रक्रियांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच पुतळ्याच्या उभारणीसाठी पीएमआरडीएकडून सुमारे ४९.७४ कोटी रुपये देऊन जमीन हस्तांतरित करण्यात आली. हा निर्णय कोणत्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून घेण्यात आला याबाबतही स्पष्टता नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात राज्य शासनाला पूर्ण माहिती न देता निर्णय घेतल्याची शक्यता असून त्यामुळे खातेनिहाय चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत स्मारकासाठीच्या वाढीव खर्चाच्या ठरावाला स्थगिती देण्यात आल्याने या प्रकरणाकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले गेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा भव्य, दर्जेदार व चिरस्थायी व्हावा यासाठी सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाबींची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. विजयकुमार पाटील यांनी केली आहे.















