- शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा..
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १८ मार्च २०२६) :- मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या वाढीव कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले. वाढीव व चुकीच्या दराने देण्यात आलेल्या निविदेविरोधात महापालिका भवनासमोर निदर्शने करत संबंधित ठेका तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, संदीप वाघेरे, सुलभा उबाळे, विश्वजीत बारणे आदी सहभागी झाले होते. स्मारकाच्या कामात पारदर्शकतेचा अभाव असून निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. “धनेश्वर ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का? प्रशासन एवढे मेहेरबान का?” असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.
नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी प्रशासनावर थेट टीका करत, “महापुरुषांच्या नावावर भ्रष्टाचार करणे लाजिरवाणे आहे. एक रुपयाची वस्तू हजार रुपयांना खरेदी केली जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे,” असे म्हटले. तर नगरसेविका सुलभा उबाळे यांनी स्मारकाच्या पूर्वीच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जागा बदलल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप केला.
नगरसेवक नाना काटे यांनी ही निविदा फुगवून मंजूर केल्याचा आरोप करत ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. “सर्वांनी विरोध करूनही निविदा मंजूर करण्यात आली, यामागे संशयास्पद कारणे आहेत,” असे त्यांनी म्हटले. संदीप वाघेरे यांनीही अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर संगनमताचा आरोप करत, “महापालिकेकडे पगारासाठी निधी नाही, मग अशा उधळपट्टीला प्रोत्साहन का?” असा सवाल उपस्थित केला.
दरम्यान, संबंधित ठेका रद्द करून संपूर्ण निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
















