सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १८ मार्च २०२६) :- हिंजवडी परिसरात भाड्याच्या वादातून रॅपीडो चालकाने प्रवाशावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजता ब्लू रिज सोसायटी, फेज १, हिंजवडी येथील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली आहे. फिर्यादी अनुराग किशोर विश्वनाथ भगत (वय ४२, रा. नाना पेठ, पुणे) यांनी ऑनलाईन रॅपीडो अॅपद्वारे चारचाकी गाडी बुक केली होती.
गाडी चालक संदिप दगडू काळे (वय ३०, रा. धायरी, पुणे) हा एमएच १२ पीक्यू ३१९२ क्रमांकाची गाडी घेऊन घटनास्थळी आला. यावेळी भाड्यावरून फिर्यादी आणि चालक यांच्यात वाद झाला. वाद चिघळताच आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीला व शेजारच्या बोटाला चावा घेतल्याने करंगळी अर्धवट कापली जाऊन गंभीर दुखापत झाली आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करत आहेत.














