सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. १८ मार्च २०२६) :- दापोडी परिसरात कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अल्वन चौक, गुलाबनगर, दापोडी येथे ही घटना घडली. फिर्यादी तुषार तुकाराम चाराकटले (वय २४, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) हे पाण्याचा जार घेण्यासाठी दुचाकीवरून जात असताना आरोपी रोहित उर्फ झुणझुण्या अशोक गुजरे (वय १९, रा. दापोडी गावठाण) याने मागून येत धारदार लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला.
या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे.
पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.












