न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील प्रलंबित विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षण विभागाकडे केली आहे. दिल्लीत महानिदेशक शोभा गुप्ता यांची भेट घेऊन त्यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.
देहूरोड परिसरात पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, पथदिवे यांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पाणी वितरण व्यवस्था सक्षम करणे, नवीन जलवाहिन्या टाकणे तसेच कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.
याशिवाय उद्यान, क्रीडांगणे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शाळांमध्ये सुविधा आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्याबाबतही त्यांनी मागणी केली.
देहूगाव ते देहूरोड पालखी मार्गाचे चौपदरीकरण व सेंट्रल चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या मागण्यांमुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.












