न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- पुणे व पिंपरी-चिंचवड या आयटी हबमधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र ‘आयटी ट्रिब्युनल’ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे आयटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी मांडल्या.
आयटी क्षेत्रात सक्तीचे राजीनामे, आर्थिक फसवणूक, पीएफ तफावत आणि फुल अँड फायनल सेटलमेंटमध्ये होणारा विलंब यांसारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत. सध्या कामगार न्यायालयात जाण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची व संथ असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना वेळेत न्याय मिळत नसल्याचे जगताप यांनी नमूद केले.
यावर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवीन संहिता आणि स्वतंत्र ट्रिब्युनल लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे राज्यातील आयटी कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळून तक्रारींचे जलद निवारण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.










