न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- राज्यातील महानगरांमध्ये स्पा आणि वेलनेस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी केली.
सभागृहात बोलताना त्यांनी पिंपरी-चिंचवडसह पुण्यात स्पाच्या आड देहव्यापार, मानवी तस्करी आणि अमली पदार्थांचे प्रकार वाढत असल्याचा आरोप केला. केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता या मागील सूत्रधारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत पुढील ३ ते ४ महिन्यांत स्पा व्यवसायासाठी स्वतंत्र व कडक नियमावली लागू केली जाईल, असे सांगितले. तसेच संबंधित एजंट व मास्टरमाइंड्सवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले.
या चर्चेला आमदार चित्रा वाघ यांनीही पाठिंबा दर्शवत महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले.












