न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- राज्य शासनाच्या ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ पिंपरी चिंचवडमध्ये उद्या, १९ मार्च रोजी म्हेत्रेवाडी प्राथमिक शाळेत महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता पार पडणार आहे.
या उपक्रमाद्वारे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
शिक्षण विभागामार्फत पालकांमध्ये जनजागृती करून मनपा शाळांबाबत सकारात्मक विश्वास निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. इयत्ता पहिलीसह सर्व वर्गांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणारे हे अभियान शहरातील सर्व शाळांमध्ये प्रभावीपणे राबवून सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्याचा महापालिकेचा मानस आहे.












