न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.१८ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना कचरा विलगीकरणाचे प्रत्यक्ष धडे दिले जात आहेत. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.
विद्यार्थ्यांना ओला, सुका, घरगुती घातक व सॅनिटरी कचरा अशा चार प्रकारांमध्ये कचरा वर्गीकरणाचे प्रशिक्षण दिले जात असून होम कंपोस्टिंगचे प्रात्यक्षिकही दाखवले जात आहे. शालेय स्तरावरच स्वच्छता आणि पर्यावरणपूरक सवयी रुजवण्यावर भर देण्यात येत आहे.
‘झिरो वेस्ट स्कूल’ संकल्पनेद्वारे शाळांमधील कचरा कमी करून पुनर्वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरणाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होत आहे. भविष्यात हेच विद्यार्थी समाजात कचरा विलगीकरणाचा संदेश पोहोचवतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.












