- सांगवी पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. १९ मार्च २०२६) :- पिंपळे गुरव परिसरात बांधकाम व्यवसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सांगवी पोलीस ठाण्यातील माहितीनुसार, अरुण श्रीपती पवार (वय ४७ पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी गिरीश धनराज भट्टेवार (वय ४७ पिंपळे गुरव) याने फसवणुकीच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या “बालाजी सेंट्रींग कन्स्ट्रक्शन” कंपनीकडून बांधकाम साहित्य भाड्याने घेतले.
दि. २० मार्च २०२५ पासून ते १७ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने एकूण २६५१ प्लेट्स आणि १३०५ प्रॉप्स भाड्याने घेतले होते. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून त्याचे भाडे न भरता मुद्दाम टाळाटाळ केली. तसेच वारंवार मागणी करूनही साहित्य परत न करता आरोपीने फिर्यादीची एकूण ४४ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक करून अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि पाटील करत आहेत.












