- ‘ट्रायोज–झूलेलाल टॉवर’ रस्त्याचे काम अखेर सुरू..
- भाजपच्या तीनही नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २० मार्च २०२६) :- पिंपळे सौदागर परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘ट्रायोज–झूलेलाल टॉवर’ या १८ मीटर रुंदीच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे हा प्रकल्प दीर्घकाळ प्रलंबित होता. मात्र, नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका कुंदाताई भिसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा रस्ता पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागातून जात असून, अनेक गृहप्रकल्पांना जोडणारा मुख्य दुवा मानला जातो. रस्ता अपूर्ण असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास तसेच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. जमीन अधिग्रहण, तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे हे काम रखडले होते. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनासोबत वारंवार बैठका घेतल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून प्रलंबित मुद्दे निकाली काढले.
कामाच्या शुभारंभावेळी शत्रुघ्न काटे म्हणाले, “निवडणुकीदरम्यान ट्रायोज आणि झूलेलाल टॉवर्समधील रहिवासी तसेच पिंपळे सौदागरमधील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण होताना पाहून समाधान वाटत आहे. हा रस्ता केवळ सिमेंट-काँक्रीटचा नसून, या भागातील दळणवळणाची लाईफलाईन आहे. अनेक अडचणी असूनही आम्ही पाठपुरावा थांबवला नाही. आता हे काम दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करून लवकरच नागरिकांच्या सेवेत आणू.”
रस्त्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक सोसायट्यांचे पदाधिकारी आणि रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. भाजप लोकप्रतिनिधींनी दाखवलेली राजकीय इच्छाशक्ती पिंपळे सौदागरला अधिक ‘स्मार्ट’ बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या प्रसंगी उद्योजक संदिप काटे, उद्योजक संजय भिसे, धनंजय भिसे तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














