- महिनाभर उपवासानंतर मुस्लिम बांधवांचा आनंदोत्सव; शहरभर सामूहिक नमाज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २१ मार्च २०२६) :- जगभरात अल्लाच्या आज्ञेप्रमाणे मुस्लिम बांधव रमजान ईद निमित्त महिनाभर उपवास करतात. भल्या पहाटेपासून दिवसभर पाणी, अन्न न पिता, खाता पकडलेला उपवास सायंकाळी नियोजित वेळेला सोडण्यात येतो. दिवसभरातील पाच वेळेची नमाज तसेच रात्रीची तराबी सामुदायिक नमाज होते. कुराण पठण केले जाते तसेच गोरगरीबांना मदत केली जाते. महिन्यानंतर चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते.
रमजान ईद आज पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून सुवासिक अत्तर लावून परिसरातील मशीदींमध्ये एकत्र येत नमाज अदा केली. मौलानांनी प्रवचन देऊन सामुदायिक नमाज पढविला. नमाजानंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. लहान मुले व महिलांनीही घरोघरी नमाज पठण केले. मोबाईलवरून नातेवाईकांना शुभेच्छा देण्यात आल्या, तर घरोघरी शीरखुर्माचा आस्वाद घेण्यात आला.
चिंचवडगाव येथील ईदगाह मैदानावर आलमगीर शाही मशिदीच्या वतीने अध्यक्ष इमरान पानसरे, अख्तर पिंजारी, मौलाना मिनहाज शेख, मौलाना इमानुल हक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर, रणजीत जाधव, संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. दुबे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष व छायाचित्रकार गुलामअली भालदार, छायाचित्रकार संतोष हांडे, यशवंत नामदे, राजेश स्टीफन, सचिन फुलसुंदर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. खराळवाडी येथील जमाते-मुस्लिम मशीद, नेहरूनगर येथील नूरानी मशीद, संत तुकाराम नगर येथील महंमदिया मशीद, वल्लभनगर येथील मजीद-ए-इमरान, नेहरूनगर येथील हजरत बिलाल मशीद, रुपीनगर येथील मदीना मशीद, गांधीनगर, पिंपरी जी.एन. कॉलनी, कासारवाडी येथील जामा मशीद, पिंपळे गुरव येथील मदीना मशीद, चिंचवड स्टेशन दवा बाजार येथील मसीद-ए-अम्मार, निगडी येथील नुरानी मशीद, आकुर्डी येथील मदीना मशीद तसेच अन्य ठिकाणी मौलानांनी नमाज पढविला.
















