- उन्हाळ्यात थंड पिण्याच्या पाण्याची सोय..
- सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 21 मार्च 2026) :- सामाजिक बांधिलकी जपत अतुल्य युवा फाऊंडेशन व सीएसआर भागीदार सत्यम ज्वेलर्स यांच्या वतीने पोलीस बांधवांच्या सेवेसाठी भोसरी, काळेवाडी आणि पिंपरी पोलीस ठाणे येथे तीन वॉटर कुलर भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे उन्हाळ्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना दिवसभर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या अतुल्य युवा फाऊंडेशनने या माध्यमातून पुन्हा एकदा सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली.
यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांत जाधव, सचिव अॅड. रोहित शिंदे, खजिनदार अतुल खुटवड, स्वप्निल मुळे, संदेश मुळे, अमोल खुटवड, सनी सोळंकी, मधुकर गुंजकर, यश अतिटकर, संदेश फुगे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
पोलीस ठाण्यांमध्ये उभारण्यात आलेल्या या सुविधेमुळे केवळ पोलीस बांधवांनाच नव्हे, तर ठाण्यात येणाऱ्या नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. सामाजिक जाणीव ठेवून केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“पोलीस बांधव हे आपले संरक्षण करण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावत असतात. उन्हाळ्यात त्यांना अनेक तास उन्हात ड्युटी करावी लागते, त्यामुळे त्यांच्यासाठी थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून अतुल्य युवा फाऊंडेशनच्या वतीने सत्यम ज्वेलर्स यांच्या सहकार्याने हा छोटासा सामाजिक उपक्रम राबवला आहे. पुढील काळातही शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.” – अध्यक्ष सूर्यकांत जाधव, अतुल्य युवा फाऊंडेशन, भोसरी…















