- महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 21 मार्च 2026) :- पिंपरी येथे उभारण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या कामाला मोठी दिरंगाई होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासाशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण स्मारकाचे काम अनेक दिवसांपासून सुरू असले तरी ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या स्मारकाकडे राज्यभरातील विद्यार्थी, अभ्यासक आणि नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र कामाचा वेग अत्यंत संथ असल्यामुळे प्रकल्पाबाबत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महत्त्वाच्या स्मारकाच्या कामात होणारा विलंब हा गंभीर मुद्दा मानला जात असून, संबंधित ठेकेदार व प्रशासन यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिकांकडून करण्यात आलेल्या मागण्यांनुसार, स्मारकाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून ते लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराची सखोल चौकशी करून त्याच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
काम पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारास कोणतेही आर्थिक देयक अदा करू नये, तसेच वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
दरम्यान, स्मारकाच्या कामासाठी ठेकेदारांना वाढीव आर्थिक लाभ देऊ नये, अशीही ठाम मागणी व्यक्त होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे स्मारक तातडीने सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन कामाला गती द्यावी, अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


















