न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (दि. 21 मार्च 2026) :- गुन्हे शाखा युनिट-३ ने दिघी पोलीस स्टेशन हद्दीत धाड टाकून विनापरवाना विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख ४८० रुपये किमतीची दारू तसेच तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार दाभाडे सरकार चौकाजवळील देवेंद्र तापकीर यांच्या शेतातील शेडमध्ये अवैध विदेशी दारू साठवून विक्री केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत रामप्रसाद साळुंखे (वय ३३), तिलक पटेल (वय २१) आणि अनिल यादव (वय २४) या तिघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून रॉयल चॅलेंज, इम्पेरियल ब्ल्यू आणि रॉयल स्टॅग या ब्रँडच्या दारूचे एकूण २० बॉक्स तसेच गोण्यांमध्ये भरलेल्या शेकडो बाटल्या असा मोठा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दिघी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या सूचनेनुसार पार पडली.
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल जावळे, पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सुर्यवंशी, श्रीधन इचके, शशिकांत नांगरे, समिर काळे, राजकुमार इघारे व निखील फापाळे यांनी संयुक्तपणे केली.








