- लाभार्थ्यांना आधुनिक सुविधांसह घरांचा ताबा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरातील झोपडीधारकांसाठी आनंदाचा क्षण ठरलेल्या कार्यक्रमात साईनाथ नगर, नेहरूनगर येथील एसआरए प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या आर.के. प्लाझा इमारतीतील २५२ सदनिकांचे चावी वाटप मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे तसेच माजी महापौर हनुमंतराव भोसले यांच्या हस्ते लाभार्थींना घरांच्या चाव्या देण्यात आल्या.
यावेळी प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक राहुल भोसले, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल मासुळकर तसेच प्रकल्पाचे विकासक राजेंद्र कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या पुनर्वसन प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थींना केवळ सदनिका नव्हे, तर आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. गॅस शेगडी, गिझर, वॉशिंग मशीन, पाणी फिल्टर, वायफाय व केबल नेटवर्क कनेक्शनसह घरांचा ताबा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात प्रथमच अशा प्रकारे सर्व सोयी-सुविधांनी युक्त घरे देण्यात आल्याने हा प्रकल्प विशेष ठरला आहे. नगरसेवक राहुल भोसले यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या माध्यमातून आतापर्यंत ५ हजारांहून अधिक झोपडीधारकांना पक्के घर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात बोलताना उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी नव्या घरात प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तर माजी महापौर हनुमंतराव भोसले यांनी “झोपडीतून सुसज्ज घरात जाणे ही मोठी बाब असून नागरिकांनी स्वच्छता व आरोग्याची काळजी घ्यावी,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रकल्पाचे विकासक राजेंद्र कदम यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.
















