- मेट्रो व स्ट्रॉम वॉटर लाईनच्या अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त…
- स्मारकाला तडे, प्रवाशांचा जीव धोक्यात…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मार्च २०२६) :- निगडी येथील शक्ती-भक्ती चौक परिसरातील लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक शेजारी सुरू असलेल्या मेट्रो आणि महापालिकेच्या स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. संबंधित कामे अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात युवक काँग्रेसचे प्रवक्ता विशाल कसबे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महामेट्रोचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून परिसरात मोठ्या प्रमाणावर राडारोडा साचला आहे. तसेच सर्वत्र मोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेच्या स्ट्रॉम वॉटर लाईनच्या कामादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे स्मारकाच्या भिंतींना तडे गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या गेल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याच परिसरात अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, अर्धवट काम आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
















