न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मालमत्ता हस्तांतरण शुल्कात ०.५% वाढ केल्याच्या निर्णयाविरोधात भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांनी मनपा. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच महापौर रवि लांडगे यांना निवेदन देत हे शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
काटे यांनी निवेदनात म्हटले की, ‘घर खरेदीवेळी आधीच स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काचा भार असताना अतिरिक्त टक्केवारीवर आधारित शुल्क अन्यायकारक आहे. पूर्वी नाममात्र शुल्क पुरेसे असताना महसूल वाढीसाठी लादलेले हे धोरण चुकीचे असल्याचा त्यांनी आक्षेप घेतला.
या शुल्कामुळे नागरिक हस्तांतरण नोंदणी टाळत असून, त्यामुळे भविष्यात महसूलावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. वाढत्या महागाईत हे शुल्क सामान्य नागरिकांना परवडणारे नसून, ते रद्द करून पुन्हा नाममात्र शुल्क लागू करावे’, अशी मागणी त्यांनी केली.















